Back to Top
Previous शरणांच्या वचन 1417_1431 आदच्या वचन Next

अरिविन मारितंदे, अवसरद रेकण्णा वचन

सूचीत परत (index)
वाचनाची निवड करा:

निवडलेल्या वचना
*

अरिविन मारितंदे


जल-मातीच्या मिश्रणाने बनलेल्या घटासम,
चित्तशक्ती एक होऊन, मज इष्टलिंग होऊन आला देवा !
चित्तस्थिरतेला ध्येय होऊन, ध्येयाला आधार होऊन,
सकल इंद्रियनिग्रहासाठी जहाज होऊन,
मज भवसागरातून पार केले देवा.
भक्तिप्रिय सत्यकरंडमूर्ती सदाशिवमूर्तिलिंगा,
माझ्या अंगात विलीन व्हावे. / 1432
राजाने अनेक राजवाडे बांधविल्यासम,
देहामध्ये अनेक स्थले आहेत म्हणून,
आत्म्याने भ्रमंती करण्याचे मर्म काय आहे सांगावे देवा ?
त्या देहातील मर्म-रहस्य :
प्राण जाता देह पडला,
राजा निघून जाता राजवाड्याची दुर्दशा झाली.
सदाशिवमूर्ती लिंगाला जाणल्यास,
एक नश्वर, एक अमर, हा एकच भेद. / 1433
तलवारीची धार बोथट झाली, तर घासून
पुन्हा धारदार करता येत नाही का ?
प्राणास विसरून आत्म्यास जाणिल्याने काही बिघडेल ?
विस्मरण, जाणीव दोन्ही असेपर्यंत
न विसरता पूजा कर सदाशिवमूर्तिलिंगाची. / 1434
आकाशात दिसणा-या ढगाळ गगनासम,
चंद्राला पाहून भरती आलेल्या सागरासम,
सूर्याला पाहून उमलणा-या कमळासम,
आत्म्यात परशिव प्रतीक पाहून,
मन उन्मनी होऊन, तनुभाव मिटवून,
निश्चय हे सत्यतत्त्व सदाशिवमूर्तीत प्रकाशित होत आहे. / 1435
आत्मा देहघटात राहून,
हाताने स्पर्श करीत, कानाने ऐकत,
नाकाने वास घेत, डोळ्याने पाहत,
तोंडाने जेवत राहत असल्यापरी,
पंचेंद्रियांत आपोआप विभागला एकच आत्मा.
त्यांच्या त्यांच्या मुखातून गुण जाणेपर्यंत
इष्टात चित्त दडून परमवस्तू व्हायला हवे,
सदाशिवमूर्ती लिंगाला जाणण्यास अनुभव घेता. / 1436
जल शांत होता, प्रतिबिंब स्पष्ट दिसते.
ते जल ढवळता, पुन्हा प्रतिबिंब स्पष्ट दिसेल का ?
विचलित चित्तामध्ये इष्टलिंगाविषयी ज्ञान निर्माण होईल का ?
अशा प्रकारे सदाशिवमूर्तिलिंगात उभयतांचे
रहस्य, तेज लिंगात प्रज्वलित आहे. / 1437
आहार, भूक लागली म्हणून स्वतः खात नाही.
पाणी, तहान लागली म्हणून स्वत: पीत नाही.
जमीन, गरीब आहे म्हणून स्वत: पेरून घेत नाही.
सदाशिवमूर्तिलिंगाला जाणण्यासाठी,
आपल्या संतोषासाठी करताना आपणच वंचनेची आशा करू नये. / 1438
दुभत्या जनावराला चारा-पेंड घातले तर,
जास्त दूध मिळते, त्याप्रमाणे -
क्रियाशुद्धीसाठी काया, वाचा, मन हे त्रिकरण शुद्ध केले तर,
परमवस्तूची प्राप्ती होईल,
अनित्य नष्ट होऊन प्रकाश मिळेल,
हेच सदाशिवमूर्तिलिंगातील सामरस्याच्या संतोषाचे स्वरूप. / 1439
पाषाणातील ज्योत, ज्वालेतील उष्णता,
फळातील सुमधुर रुचीसम,
परिपूर्ण चित्तातील विलासासम सदाशिवमूर्तिलिंगामध्ये
आत्मलिंगातील घनप्रकाश दिसत आहे. / 1440
दगड, वृक्ष, मातीमध्ये पूजा करवून घेणारी
वस्तू दडली आहे का, आपल्या मनाच्या जाणिवेविना ?
तेथे जाणावयाचे ज्ञानच
परमवस्तू होऊन प्रकाशित होत आहे,
सदाशिवमूर्तिलिंग होऊनी. / 1441

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

*
Previous शरणांच्या वचन 1417_1431 आदच्या वचन Next