Previous लिंगायत विश्व संदेश लिंगायत वीरशैव वेगवेगळे Next

लिंगायतमध्ये नेम, व्रत आणि शील

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये नेम, व्रत आणि शील

लाभले जे त्याचा अंगीकार करा, तो एक नेम.
आहे आपुल्यापाशी त्याची न करावी वंचना, तो एक नेम.
आचरणामाजी न चुकावे कधीही, तो एक नेम.
बोलावे न खोटे, तोही एक नेम.
कूडलसंगय्याच्या शरणांचे होता आगमन,
सर्वस्व समर्पावे, तो एक नेम./271 [1]

दुधाचा नेम, दुधाच्या सायीचा नेम,
साय नसेल तर खिचडीचा नेम,
लोण्याचा नेम, गुळाचा नेम,
पण अंबिलीचा नेम करणा-या कोणा पाहिले नाही.
कुडलसंगमदेवाच्या शरणांमध्ये
अंबिलीचा नेम धरणारे मादार चेन्नय्या होत./405 [1]

दूध उष्टे वासराचे, उदक उष्टे माशांचे,
पुष्प उष्टे भ्रमराचे.
कशी पूजा करू ? शिव शिवा, कशी पूजा करू ?
हा उष्टेपणा नष्ट करणे माझ्या हाती नाही देवा.
अर्पिले ते स्वीकारा, कुडलसंगमदेवा. /406 [1]

व्रत दुधाचे धरियेले, तया मार्जारजन्म लाभे.
व्रत हरभ-याचे धरियेले, तया अश्वजन्म लाभे.
व्रत शुद्धोदकाचे धरियेले, तया मंडूकजन्म लाभे.
व्रत पुष्पांचे धरियेले, तया भ्रमरजन्म लाभे.
षट्स्थ लबाह्य हे सारे.
जयाठायी खरी भक्ती नसे,
तया गुहेश्वर झिडकारितसे. /635 [1]

शीलवंत शीलवंत म्हणतात, हे आम्ही जाणत नाही.
ललनेचे अधरपान आपल्या पोटात जाईपर्यंत
कोठे आहे हो शील ?
ईषणात्रयरूपी कुत्रे पाठी लागून येत असता,
कोठे आहे हो शील ?
हे सारे दूर सारून मन परशिवात स्थिर झाल्यास शील.
त्याचे सुख दृढ झाल्यास शील.
ह्या कारणे,
कूडल चेन्नसंगय्यात शीलवंत अपूर्व असती. /911 [1]

शील शील म्हणून अहंकाराने बोलत आहेत,
परंतु शील कोणते हे नाहीत जाणत.
असलेल्याची वंचना न करणेच शील,
नसतानाही उसने न मागणेच शील,
परधन, परस्त्रीकडे ओढ नसणेच शील,
परदैवत, परधर्माकडे ओढ नसणेच शील,
गुरुनिंदा, शिवनिंदा, जंगमनिंदा न ऐकणेच शील.
कूडल चेन्नसंगाच्या शरणांचे आगमन होता,
प्रीतीपूर्वक सामोरे जाणे जाणल्यास
तेच 'शुद्ध शील'./913 [1]

शील शील म्हणतात, परंतु शील भक्तीमध्ये नाही.
त्याचे कारण म्हणजे :
धान्य धरणीचे उष्टे, सोवळे पाणी मेघांचे उष्टे,
परिमळ वायूचे उष्टे, स्वयंपाक अग्नीचे उष्टे,
हातात दीप धरूनही डोळ्यांना न दिसता
अडखळून पडणा-या कुटिल शीलवंतांना
मान्य करेल का कूडल चेन्नसंगमदेव ?/914 [1]

नि:कामीखेरीज कामीस व्रत असते का ?
समाधानीखेरीज क्रोधीस व्रत असते का ?
उदाराखेरीज लोभीस व्रत असते का?
ऐसे क्षमा, निग्रह, शांती, समाधानादी ।
संपदेने युक्त होऊन, गुरुलिंगजंगमासी
तनुमनधन अर्पिण्यात तत्पर होऊन,
कुडीत प्राण असेतो चित्त शुद्धात्म होऊन
राहणारा महाभक्तच कृत्यविरहित शरण.
तयाची चरणमुद्रा मम हृदयी सदा राहे ठसून.
आचारचि प्राण असलेले रामेश्वरलिंग
तयांच्या बैलांचा गोठा होऊन राहतसे./ 1246 [1]

दुष्टांना घाबरून, मारून-मुटकून अवलंबिता येई का व्रत ?
अशा व्रताचे स्वरूप कसे म्हणजे -
धारदार पात्यास लावलेल्या तुपाच्या रुचीस भाळून
पाते चाटता जीभ कापल्याने विव्हळणाच्या जिवापरी.
श्रद्धा-प्रीतीविना भक्ती, दृढनिश्चयाविना निष्ठा,
जणू सावरीचे झाड राखणा-या पक्ष्यापरी.
असे हे समग्र मर्म न जाणलेल्याचा व्रताचार
प्राणिवध, शील आणि सूतकास बळी पडे.
आचारचि प्राण असलेल्या रामेश्वरलिंगापासून
बहिष्कृत असलेला हा नेम./1254 [1]

व्रत म्हणजे काय ? परवस्तू दर्शनार्थ सोपान.
व्रत म्हणजे काय ? इंद्रियांची मोळी भंगविणारी कुलकुठार,
व्रत म्हणजे काय ? सकल संसारासाठी दावानल.
व्रत म्हणजे काय ? सर्व दोषांचा नाश.
व्रत म्हणजे काय ? जागृत चित्ताने परवस्तू
पाहण्यासाठी अवलंबिण्याचे साधन.
व्रत म्हणजे काय ? आचारचि प्राण असलेले रामेश्वरलिंग
तयांसाठी कोवळे बालक होऊन राहे. /1259 [1]

परधनाला नकार देणे हेच व्रत.
परस्त्रीचा संग न करणे हेच शील.
जीवहिंसा न करणे हाच नेम.
तथ्य-मिथ्य संदेह निरसून राहणेच नित्यनेम.
ईशान्यमूर्ती मल्लिकार्जुनलिंगाला हे व्रत नि:संदेहपणे आवडते. /2039 [1]

शीलवंत शीलवंत म्हणवतात,
शील कुणाला समजले आहे सांगा ?
भूमीला शील म्हणायचे काय ?
महार, अठरा पगड जाती या भूमीवरच चालतात.
पाण्याला शील म्हणायचे काय ?
मासे, मगरी, पक्षी-प्राणी यांनी
पाणी उष्टे केलेले असते.
पिकाला शील म्हणायचे काय ?
ते तर बैल, गाढवे यांनी उष्टे केलेले असते.
सोन्याला शील म्हणायचे काय ?
गावाला भार झालेले असते.
स्त्रीला शील म्हणायचे काय ?
ती तर डोळ्यांनी सतावत असते.
मग शील म्हणायचे तरी कशाला सांगा अण्णा ?
यात अडकलेले सगळे शीलशून्य.
यांच्या संगतीत असून नसल्यासारखा,
संगत सोडून न सोडल्यासारखा,
आपल्या मनाचे शील सांभाळणाराच
खरा शीलवंत पहा,
बसवप्रिय कूडल चेन्नबसवण्णा. /2164 [1]

दिनचर्यात, मासात सप्ताहात
सोमवार उपवास करावा म्हणतात,
द्वादश मासात श्रावण सोमवार
उपवास करावा म्हणतात
माघ मासाच्या चतुर्दशि दिवसी उपवास,
रात्री जागरण करावे म्हणताता
असे वार मास तिथिंच्या दिवसी
अन्नपाणी सोडून उपवास करून
आत्म्याला क्लेश देवून देहाला दुर्बळ करून
तुम्ही व्रत आचरिल्यास तो तुमचा आत्म द्रोह
त्या देवतांना दु:खवून परत भव भवात जाणार
या कारणे उपवास करू नयेत
उपवास करण्याने प्रयोजन नाही
ते कसे म्हणजे जेवून करून लिंग पूजा करावी
जेवण कपडालता देवून जंगम पूजा करावी
असे त्रिविधाचे भेद जाणलेले
उपवास करू नये म्हाणतात
काडिनोळगाद शंकरप्रिय चन्नकदंबलिंग निर्मिय प्रभुवे

दूधाचा नेम धरणारा मांजार होवून जन्मणार
हरभत्याचा नेम धरणारा घोडा होवून जन्मणार
पाण्याचा नेम धरणारा बेडूक होवून जन्मणार
फूलाचा नेम धरणारा मघमाशी होवून जन्मणार
हे षटस्थळाला सोडून केलेले आचरण
खरी भक्ती नसणात्यांना गुहेश्वर पावत नाही

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायत विश्व संदेश लिंगायत वीरशैव वेगवेगळे Next