Previous लिंगायतमध्ये देव स्वरूप लिंगायत धर्मगुरु गुरु बसव Next

लिंगायतमध्ये पुरुष स्त्री समानता

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये पुरुष स्त्री समानता

सुवर्णासी माया म्हणती,
सुवर्ण नव्हे हो माया.
कामिनीसी माया म्हणती,
कामिनी नव्हे हो माया.
भूमीसी माया म्हणती,
भूमी नव्हे हो माया.
मनी उपजते जी आसक्ती,
तीच जाणावी माया, पहा हो गुहेश्वरा. /648 [1]

आपणच केलेली स्त्री आपल्या डोक्यावर चढली.
आपणच केलेली स्त्री आपल्या मांडीवर बसली.
आपणच केलेली स्त्री ब्रह्माच्या जिभेवर बसली.
आपणच केलेली स्त्री नारायणाच्या छातीवर बसली.
यास्तव, स्त्री स्त्री नव्हे, स्त्री राक्षसी नव्हे,
स्त्री प्रत्यक्ष कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पहा हो ! /१०१८ [1]

कनक त्यागुनी लिंगासी प्रसन्न करावे म्हणती,
कनक आणिक लिंग परस्पर विरुद्ध आहेत ?
कामिनी त्यागुनी लिंगासी प्रसन्न करावे म्हणती,
कामिनी आणिक लिंग परस्पर विरुद्ध आहेत?
भूमी त्यागुनी लिंगासी प्रसन्न करावे म्हणती,
भूमी आणिक लिंग परस्परविरुद्ध आहेत?
अंग सोडुनी लिंगासी प्रसन्न करावे म्हणती,
अंग आणिक लिंग परस्पर विरुद्ध आहेत ?
इंद्रिये धिक्कारून लिंगासी प्रसन्न करावे म्हणती,
इंद्रिये आणिक लिंग परस्पर विरुद्ध आहेत ?
जग त्यजुनी लिंगासी प्रसन्न करावे म्हणती,
जग आणिक लिंग परस्पर विरुद्ध आहेत?
याचिकारणे, उच्छेदल्यास कोप नि अप्रसन्नता,
घडू शकेल दर्शन परंज्योती,
परमकारुणिक, परमशांत लिंगप्रभूचे;
नच जाणल्यास ते असंभव.
हे ज्ञानदृष्टीने पाहिल्याने लाभलेले सुख असे,
मसणय्यप्रिय गजेश्वरा. /1309 [1]

पुरुषाने मोहित होऊन नारीस वश केल्यास
ती आपली संपत्ती असे जाणावे.
नारीने मोहित होऊन पुरुषास वश केल्यास
त्याचे उत्तर कोणते ते जाणून घ्यावे.
ह्या दोहोंतील द्वंद्व निरसून
आपण सुखी होऊ शकल्यास
नास्तिनाथास परिपूर्ण म्हणेन. /1311 [1]

येता स्तनांना उभारी, म्हणतात नारी.
फुटता मिसरूड जर, म्हणतात नर.
ज्ञान ह्या उभयाचे, नारी असे की नर, नास्तिनाथा? /1312 [1]

असता स्तन नि केशसंभार,
हे नारी म्हणण्यास नसे प्रमाण.
असता दाढी-मिशा नि कट्यार,
हे नर म्हणण्यास नसे प्रमाण.
ती असे हो जगाची दृष्टी,
नव्हे ती जाणकारांची नीती.
फळ असो मग कोणतेही,
फळ म्हणण्या माधुर्यच कारण.
भले सौंदर्यहीन असले तरी,
पुष्पम्हणण्या गंधच कारण.
मर्म याचे तुम्हीच जाणे, शंभुजक्केश्वरा. /1348 [1]

सतीच्या प्राणाला स्तन, केस असतील का ?
ब्राह्मणाच्या प्राणाला यज्ञोपवीत असेल का ?
कनिष्ठ अंत्यजाच्या प्राणाने क्षुद्रत्वाची काठी धरली का ?
तुझे न सुटणारे कोडे,
जगातील जडलोकांना समजेल का, रामनाथ ? /1760 [1]

स्तन, केस आहेत म्हणून स्त्री म्हणतो.
दाढी, मिशा आहेत म्हणून पुरुष म्हणतो.
त्यांच्यातील आत्मा स्त्रीही नव्हे, पुरुषही नव्हे, पहा रामनाथ. /1764 [1]

सतीचे गुण पतीने पहावे, पण
पतीचे गुण सतीने पहावे का ? असे म्हणतात.
सतीचा अनाचार पतीला हानिकारक नाही का ?
पतीचा अनाचार सतीला हानिकारक नाही का ?
एका देहातील दोन्हीपैकी
एका डोळ्याची ही दृष्टी नष्ट होता, नष्ट कोणाला
हे जाणल्यास, कालांतक भीमेश्वरलिंगात योग्य होईल. /1785 [1]

*

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
Previous लिंगायतमध्ये देव स्वरूप लिंगायत धर्मगुरु गुरु बसव Next