Previous लिंगायतमध्ये स्वर्ग, नरक लिंगायतमध्ये देवलोक, मर्त्यलोक Next

लिंगायतमध्ये देहच देऊळ

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये देहच देऊळ


धनवान बांधिती शिवालय,
करू मी काय, असे गरीब
मम पायच खांब, देहच देऊळ,
शिर पहा सुवर्णकळस.
कुडलसंगमदेवा ऐका हो,
स्थावरास असे नाश, परि जंगम असे अविनाशी. /75 [1]

देहामध्येच देवालय असता,
अन्य देवालयाची काय आवश्यकता ?
दोहोंचे प्रतिपादन करू नये.
गुहेश्वरा, तू स्वयं पाषाण असल्यास मी काय आहे ? /541 [1]

मर्त्यलोकीच्या मानवांनी
देवळात एक देव बसविता, झालो मी अचंबित.
नित्य नित्य अर्चन-पूजन करवून
नैवेद्यार्पण करणा-यांना पाहून झालो मी चकित.
असे लिंग मागे ठेवून गेले निघून,
गुहेश्वरा, तुमचे शरण. / 588 [1]

बहिरंगात शिवलिंग, अंतरंगात अन्य दैवत.
बहिरंगात लिंगक्रिया, अंतरंगात अन्य क्रिया.
बहिरंगात भक्त, अंतरंगात भवी.
यांना भक्त म्हणावे का ? म्हणू नये.
तुमची पूजा करतात म्हणून भक्त म्हणावे का ?
हा सदाचार नाही, हे लिंगवंतांना आवडणार नाही.
या उभयतांतील मर्मभेद तुम्हीच जाणता.
माझ्या मनाला हे अमान्य, मला यातील कोणती बुद्धी आहे,
याचा विचार तुम्हीच करून करुणा करावी,
उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. /1572 [1]

ब्रह्माच्या मागे सरस्वती माया होऊन आली.
विष्णूच्या मागे लक्ष्मी माया होऊन,
भवात भटकत आली.
रुद्राच्या मागे उमादेवी माया होऊन,
शिर नि मांडीवर बसून कष्ट देत आली.
तिळात तैल होऊन,
काट्याचे टोक होऊन,
फुलात सुगंध होऊन,
त्यांच्या-त्यांच्यात अभिन्न प्रतिरूप होऊन,
आवाज न करता माया त्रास देते.
मृदंगाचा आवाज जाण्याआधी
कालांतक भीमेश्वरलिंग
जाणून घेण्याचा निश्चय करा. /1782 [1]

देह हेच देवालय, पाय हेच खांब,
शिर हेच शिखर पहा;
हृदयकमलकर्णिका हेच सिंहासन.
महाघनपरतत्त्व अशा प्राणलिंगाची मूर्ती करून,
परमानंद अमृतजलाने मार्जन करून,
महादळपद्माच्या पुष्पाने पूजा करून,
परमतृप्तिकारक अशा नैवेद्याची रास करून
प्राणलिंगाशी प्राणसंबंध असलेली
पूजा करीत आहे पहा,
हे महालिंगगुरू शिवसिद्धेश्वर प्रभू ! / 2338 [1]

ब्रह्म देव नव्हे, विष्णू देव नव्हे, रुद्र देव नव्हे,
ईश्वर देव नव्हे, सदाशिव देव नव्हे.
सहस्रशिर, सहस्रनेत्र, सहस्रपादयुक्त
विराटपुरुषही देव नव्हे.
विश्वतोमुख, विश्वतोचक्षु, विश्वतोबाहू,
विश्वतोपादयुक्त परमपुरुषही देव नव्हे.
सहज निरालंबच आपण म्हणून जाणणारा
महाशरण आपणच देव पहा,
अप्रमाण कुडलसंगमदेवा, / 2453 [1]

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायतमध्ये स्वर्ग, नरक लिंगायतमध्ये देवलोक, मर्त्यलोक Next