Previous अप्पिदेवय्या अमरगुंडचा मल्लिकार्जुनतंदे Next

अंबिगर चौडय्या

पूर्ण नाव: अंबिगर चौडय्या
वचनांकित : अंबिगर चौडय्या
कायक (काम): बोट नौदल व्यवसाय

अग्नी सत्य म्हणता लाकडाविना ते असत्य होते.
लाकडातील सुप्त अग्नी लाकडाला जाळीत नाही.
हा भेद जाणणाराच प्राणलिंगी म्हणे अंबिग चौडय्या. /1379 [1]

जंगलात भटकविणारी, उकळत्या पाण्यात बुडविणारी,
जटा बांधुनी राख फासणारी, वस्त्र उतरविणारी,
केस उपटविणारी, साच्या गावात प्रतिप्रश्न उठविणारी,
असा गूढ मायेचा डांगोरा पिटणा-या,
दांभिक जंगमांचे बोलणे
ऐकून लज्जित होतो म्हणे अंबिग चौडय्या./ 1380 [1]

जंगलात शोधावे तर तो देव, मोडलेले काटेरी झुडूप नव्हे.
पाण्यात शोधावे तर तो मासा-बेडूक नव्हे.
तप करावे तर वेषांतराला भुलणारा नव्हे.
देहदंडन करून मागावे तर तो ऋणदाता नव्हे.
अष्टतनूत दडलेल्या लिंगास स्पर्शन शोधून पाहिले
म्हणे अंबिग चौडय्या.
/1381 [1]

बसवयुगातील रोखठोक बोलणारा, निर्भीड शरण म्हणून हा प्रसिद्ध असून याचा काळ इ. स. ११६० आहे. नावावरून हा नावाडी होता असे दिसून येते. त्याच्या वचनांतही त्याच्या उद्योगाचे वर्णन आहे. आपले नावच अंकित करून त्याने लिहिलेली २७८ वचने सापडली आहेत. त्यांमध्ये मुख्यत्वे समाजाचे विडंबन दिसते. जात-पात, दांभिक आचरणे यांच्यावर त्याने कडाडून हल्ला केला आहे. काही वचनांमध्ये धार्मिक तत्त्वजिज्ञासा दिसून येते.

गळ्यात असुरमाळा नाही, त्रिशूळ-डमरू नाही,
ब्रह्मकपाल नाही, भस्मलेपन नाही,
वृषभवाहन नाही, ऋषिमुनींच्या सहवासात असणारा नाही.
संसारसागरात फेकलेल्या संसारलक्षणविहिनांना
दुसरे कुठलेच नावही नाही म्हणे अंबिगर चौड्य्या /1387 [1]

धारण केलेल्या लिंगाला कनिष्ठ करुनी,
पर्वतावरील लिंग श्रेष्ठ करण्याची रीत पहा !
नि:सत्त्व ढोंगी दिसता, नवीन पादरक्षा घेऊन
फटा-फटा मारावे असे म्हणे अंबिगर चौडय्या./1393 [1]

शिलामूर्तीची पूजा करून,
कलियुगाचे गाढव होऊन जन्मले.
मृत्तिका देवाची पूजा करून, मानहीन झाले.
वृक्षास देव मानुनी, पूजा करुनी मातीत मिसळले.
बहुदेवोपासना करुनी स्वर्ग मिळाला नाही.
चराचरात व्यापलेल्या परशिवामध्ये किंकर झालेला
शिवभक्त श्रेष्ठ असे म्हणे आमचा अंबिगर चौडय्या./1395 [1]

डोंगरावरील लिंगाला महान मानून पुजणाच्या मूर्वांनो,
काढून द्या तुमच्या गळ्यातील इष्टलिंग.
आमच्या हाती दिला नाहीत तर,
जलप्रवाहाच्या मध्ये नेऊन बांधून,
बुडवून तुम्हांला लिंगैक्य करतो
म्हणे आमचा अंबिग चौडय्या./1407 [1]

गुळाला असे चौकाकार, पण गोडीला असे का चौकाकार ?
प्रतिकाची पूजा करता येईल, पण
ज्ञानाची पूजा करता येईल का ?
ज्ञान परिपूर्ण होता, हातातले प्रतीक त्यामध्येच लीन होईल
म्हणे अंबिग चौडय्या /1408 [1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous अप्पिदेवय्या अमरगुंडचा मल्लिकार्जुनतंदे Next