Previous शरण आणी शरणे अक्कम्मा (काळ इ. स. सुमारे ११६०) Next

अक्क महादेवि, अक्कमहादेवि (महादेवि अक्का)

पूर्ण नाव: महादेवि
वचनांकित : चेन्नमल्लिकार्जुन
अनूठी खासियत: कन्नडची पहिली महिला कवयित्री

कामांतकासी जिंकिले बसवा, तव कारणे.
शशिधरासी वश केले बसवा, तव कृपेने.
संबोधन नारी ऐसे, म्हणून काय जाहले ?
भावात असे नररूप बसवा, तव दयेने.
अतिकामी चेन्नमल्लिकार्जुनासी आव्हान देऊन,
द्वैत विसरून समरसले बसवा, तव कृपेने./1161 [1]

आपणचि आपुल्या विनोदार्थ
रचिले सकल जगत.
आपणचि आपुल्या विनोदार्थ
वेढिला त्यास सकल प्रपंच.
आपणच आपुल्या विनोदार्थ
फिरविले अनंत भवदुःखात.
ऐसा मम चेन्नमल्लिकार्जुन नामे परशिव
पुरे वाटता जगविलास,
आपणचि तोडी मायापाश./1191[1]

भूमीत दडल्या निधानापरी,
तैसेचि फळातील रुचीपरी,
अन् शिळेतील सुवर्णापरी,
तिळात लपल्या तैलापरी,
आणिक वृक्षातील अग्नीपरी,
ब्रह्म होऊन भावात लपलेल्या
चेन्नमल्लिकार्जुनाचे निजरूप
कोणासी जाणता न ये सहजी/1199[1]

महादेवीअक्का, अक्कमहादेवी ह्या नावाने ओळखली जाणारी ही श्रेष्ठ वचनकर्ती आहे. प्रथम कन्नड कवयित्री, कन्नडमधील श्रेष्ठ कवयित्री. चेन्नमल्लिकार्जुनच आपला पती मानून, लौकिक संसाराचा त्याग केलेली विरागिणी.

कन्नडमधील अनेक काव्यपुराणांनी हिचे जीवनचरित्र रेखाटले आहे. हिचे वडील निर्मलशेट्टी व आई सुमती. शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुर तालुक्यातील उडुतडी (सध्याचे उडुगणी) हिचे जन्मस्थळ होय. कौशिक नावाचा राजा तिच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरतो. परिस्थितीच्या दबावामुळे नाइलाजाने महादेवी काही अटी घालून त्याच्याशी लग्न करते. परंतु त्याने तिच्या अटी मोडताच ती राजवाड्याचा त्याग करून मल्लिकार्जुनाच्या शोधार्थ केशांबरी होऊन निघते. रानावनातून अनेक अडीअडचणींना तोंड देत ती कल्याणला पोहोचते. अनुभव मंटपामध्ये अल्लमप्रभुंच्या सर्व प्रश्नांना धीटपणे, वैचारिकपणे, आध्यात्मिक पातळीवर योग्य उत्तरे देऊन सर्व शरणांच्या स्तुतीला पात्र ठरते. काही दिवस तेथे राहून प्रभुदेवांच्या मार्गदर्शनानुसार चेन्नमल्लिकार्जुनाचे स्थान असलेल्या श्रीशैलमधील कदळीबनात ऐक्य पावते.

अक्कमहादेवी मूर्तिमंत विचारस्वातंत्र्याची महिला होय. पती व व्यक्ति-स्वातंत्र्य या दोहोमधून पतीचा त्याग करून व्यक्तिस्वातंत्र्याची निवड करणारी इतिहासातील अगदी दुर्मिळ अशी स्त्री अक्कमहादेवी.

अक्का एक श्रेष्ठ वचनकर्ती होय. 'चेन्नमल्लिकार्जुन' या वचनांकिताने तिने लिहिलेली ४३४ वचने उपलब्ध आहेत. तिच्या जीवन साधनेमधील सर्व टप्प्यांमधील भावलहरी तिच्या वचनांमध्ये जिवंतपणे अभिव्यक्त झाल्या आहेत. जीवनातील सुख-दुःखे व आध्यात्मिक स्थायिभाव हे त्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य आहे. 'शरण सती, लिंग पती' हे तत्त्व तिच्या वचनांत स्थायी स्वरूपात राहिले आहे. त्यामुळे भावतीव्रता उठून दिसते व त्या वचनांना भावगीतांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. साहजिकच, वचन साहित्यामध्ये सर्व दृष्टींनी त्यांना वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. तत्कालीन शरणांनी हे ओळखूनच तिची हरत-हेने स्तुती केली आहे. वचनांशिवाय योगांगत्रिविधी, स्वरवचने, सृष्टीचे वचन, मंत्रगोप्य वगैरे इतर साहित्यही तिने लिहिले आहे. तथापि तिचे संपूर्ण अंतरंग दिसून येते ते तिच्या वचनांमध्येच.

वेद, शास्त्र, आगम, पुराण,
सत्त्व नाही त्यात खासा;
जैसे कांडिल्यावरी धान,
पहा उरतो मागे कणी, भुसा.
कशासाठी ते कांडावे अन्
कशासाठी ते पाखडावे ?
भटकणाच्या मनाचे अग्र
घेतले जर का जाणून,
केवळ शून्यचि शून्य
प्रभू चेन्नमल्लिकार्जुन !/1225 [1]

विना संग ना अग्नी उपजे,
विना संग ना बीज अंकुरे,
विना संग ना पुष्प उमले,
विना संग ना सर्वसुख लाभे.
चेन्नमल्लिकार्जुनदेवा,
तव महानुभावींच्या सत्संगाने
मी परमसुखी जाहले !/1227 [1]

अमर, अविनाशी अन् रूपरहित
सजणावर मी भाळले गे आयांनो.
चिन्हविहीन, ना समीप, ना दूर अशा अभिन्न
सजणावर मी भाळले गे आयांनो.
भवरहित, भयरहित ऐशा निर्भय
सजणावर मी भाळले गे आयांनो.
सीमातीत निस्सीमावरी भाळले मी.
चेन्नमल्लिकार्जुन नामे पतीवरी
मी अति अति भाळले गे आयांनो !/1230 [1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous शरण आणी शरणे अक्कम्मा (काळ इ. स. सुमारे ११६०) Next