Previous लींगाचार शिवाचार Next

सदाचार

*

‘कायकवे कैलास' या शरण तत्वाचा अंगिकार करून परावलंबी होऊन जगणे हे महापाप समजून सत्य, शुध्द कायकाने पैसे मिळवून, आपल्याला आवश्यक तेवढे खर्च करून उरलेले धन समाजाला द्यावे व शुध्द, पवित्र जीवन जगत राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावावा हाच सदाचार,

“कायक न करणारे भक्त नव्हेत.''
सत्य, शुध्द नसलेले हे कायक नव्हेत
(शरण उरिलिंगपेद्दी)

शरण धर्माच्या अनुयायांचे लक्षण म्हणजे कार्योन्मुखता. कायक न करता परावलंबी असणारा तो भक्त नव्हे. म्हणून कोणताही उद्योग कसाही करून पैसे मिळविणे हा कायक नव्हे. अपवित्र मार्गांनी लाखोंनी कमवून हजारोंनी दान करण्यापेक्षा सत्य, शुध्द कायक करून शंभर रूपये कमवून दहा रूपये दान देणारा तो परमपवित्र दानी होय. सत्यता आणि शुध्दता ही कायकाची प्रमुख लक्षणे आहेत. म्हणून प्रत्येक शरणधर्म स्वीकारलेल्यांनी शरण धर्माप्रमाणे कायक हे कैलास पाहिजे, असा नियम आहे.

आयदकी लकामांच्या वचनावरून कायक करणान्यांनाच अनुभव मंडपात प्रवेश होता. त्यांना महाशरणांचा सत्संग, अनुभव गोष्टी, चर्चा यामध्ये भाग घेण्यास वाव होता असे दिसते. कायकात श्रेष्ठता (Dignity of labour) आणि कायकात दैवत्व (Divinity of labour) जाणण्याची दृष्टी बसवण्णांनी दिली. 'कायकामुळे कैलास' म्हणजे हे दुस-या सिध्दीचे कारण म्हणून न जाणता, कायक हाच कैलास म्हणजे याचे अर्थ मर्म जाणून केल्यास यांतच
आत्यंतिक सिध्दी मिळते असे समजावून दिले. कायक आणि दासोह यामध्येच साक्षात्कार मिळतो.

आपापले प्रामाणिक, सत्य, शुध्द कायक करताना आत्मानंद मिळतो असे तत्व प्रचारात आणले. गुरू असो वा जंगम असो सर्वानी कायक केलेच पाहिजे, कायक करूनच भोजन करावे असा ही नियम होता.

एका गांवात राहून तेथील लोकांमधील लोप, दोष काढून बोध, दीक्षा,अनुग्रह याद्वारे सुधारण्याचे कायक करणारा तो गुरू.

गांवोगांव संचार करीत, धर्मबोध करण्याचे कायक करणारा तो जंगम, आजच्या नवयुगात धर्मबोध करणे हे कायकच आहे का? म्हणून चेष्टा केली जाते. धर्मबोधाचे मर्म न जाणणारे, धर्मप्रचारकाचे सोंग घेऊन धन संग्रह करणा-यांना भिक्षुक समजतात. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की, ख्रिश्चन धर्मात, समाजात धर्मप्रचारकांबद्दल नितांत पूज्य भावना असल्यामुळे तो समाज सुसंघटीत आहेच शिवाय शतवेगाने त्याची वाढही होत आहे.

केवळ उपजीवनासाठी मार्ग दाखविणा-या, लौकिक विद्या देणा-या शिक्षकांची वृती अत्यंत पवित्र असे आपण मानतो. मग सत्य जीवनाच्या मार्गाचे महत्व जाणून लौकिक जीवनातील असंख्य दुःखाचा भार हलका करून, तळमळणाच्या ह्यदयाला शुध्द, सत्य बोध देऊन सांत्वना देणा-या बोधकाचे कार्य पवित्र नव्हे काय?

भौतीक पीक देणा-या शेतक-याला आपण पवित्र जीव मानतो तर अध्यात्मिक पीक देऊन आत्मतृप्ती देणारे धर्मगुरूंचे पवित्र कायक होणार नाही का? बाहेरच्या शत्रुपासून आपले रक्षण करणाच्या सैनिकांचे पवित्र कायक मानल्यास, आंतरिक षड्ररिपुपासून रक्षण करणा-या सद्गुरूचे पवित्र कायक नव्हे का? धर्मबोधक हा प्रत्यक्षपणे हातात कुदळ अथवा रायफल धरून शरीराने कायक करीत नसला तरी शेतक-यांत कायक निष्ठा, प्रामाणिकपणा, युवकांत राष्ट्राभिमान, अधिकारी वर्गात लाच घेऊ नये ही पाप भीती, व सर्वसामान्यात नैतिकता वाढवून जनजीवन सांस्कृतिक दृष्टीने उंचविल्यास याहून पवित्र कायक ते कोणते?

आज आपल्या शिक्षणात वैज्ञानिक, कलात्मक, सामाजिक आदि सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असले तरी ही जीवनाला आवश्यक असणान्या नैतिक शिक्षणाची कमतरता आहे. सरकारी शिक्षण संस्थांमधून मिळत नसलेले नैतिक शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धर्मबोधक देत असल्यास त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ तो कोण असणार? एवढे मात्र खरे की, धर्मबोधाच्या बुरख्याखाली दौर्जन्य,जातीयता व अंधश्रध्दा वाढवून मुग्ध भक्तांचे शोषण केल्यास यापेक्षा अधम पापकृत्य दुसरे कोणतेही नाही. विश्वास ठेवून आलेल्या अनुयायांना चुकीच्या मार्गावर चालविणे हा अक्षम्य अपराध होय.

क्रिस्चयन धर्मात प्रचारकांबद्दल चांगले मत असते, आदर असतो पण त्यामागे त्या प्रचारकांची आपल्या कार्यावरील निष्ठा, तळमळ व सचोटी कारणीभूत असते हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या धर्मगुरूंच्या तत्वांचा प्रचार करण्यात त्यांना आत्यंतिक शांती मिळते. प्रचारकार्य हे पवित्र कर्तव्य मानून ते त्याचा स्वीकार करतात. पण विकृत झालेल्या लिंगायत समाजात मात्र धर्मप्रचारासाठी स्वामित्व मठाधिकार याचा स्वीकार करण्याऐवजी मठाचे उत्पन्न व इस्टेट यासाठी भगवा घालणारेच अधिक झाले आहेत.

मठाधिकार घेण्याच्या चुकीसाठी का होईना, ते धर्मप्रसाराचे कार्य करीत नाहीत हा धर्मद्रोह होय. आणखी एक मोठी चूक म्हणजे मठाधिकारी किंवा प्रचारक निवडताना पात्रता वा योग्यता पाहिली जात नाही. खिश्चन पाद्री किंवा बौद्ध भिक्षुना ज्याप्रमाणे पारखन घेतले जाते तसे पारखून, त्यांच्या ज्ञानाची कसोटी पाहनच जंगमांची निवड करून नंतरच त्यांना धर्मप्रचार कार्यास प्रवृत्त करावे.योग्यता असली नसली तरीही जातीयतेवर मठाधिकार देण्याचा मूढ संप्रदायच समाजाच्या विघटनास व पतनास कारणीभूत झाला आहे.

स्वयंस्फूर्तीने, त्यागभावनेने आलेले साधक, कोणतेही पीठ, मठ वा संपत्ती यांची अपेक्षा न धरता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता धर्मप्रसारासाठी मेहनत घेतात. त्यांना जेवणे, खाणे, भरजरी वस्त्रे हेच ध्येय नसल्याने आपल्या जीवनात काहीतरी परमार्थ साधावा अशी त्यांची प्रबल इच्छा असते. म्हणून त्यांच्याकडून सर्व काही हिसकावून घेतले तरीही आपले कर्तव्य ते सोडत नाहीत. कर्तव्य सोडल्यास आत्मशांती मिळणार नाही याची त्यांना जाण असते. म्हणूनच तशा प्रकारची आसक्ती, त्यागभावना असणा-यांनाच मठ अगर पीठासाठी निवडण्याचे शहाणपण भक्तांच्यात यावयास हवे, भक्तांनी दाखवावयास हवे.

हे जाणूनच शरणांनी, कितिही मोठे असले तरी ही सर्वजणानी कायक करावयास हवा असा नियम, असा दंडक केला.

मोळिगेय मारय्यासारखा राजा राज्यत्याग करून आल्यावेळी लाकडे तोडून विकण्याचे कायक त्यास करावे लागले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखा आणखीन एक मुद्दा म्हणजे कोणतीही व्यक्ती करीत असलेल्या कायकावरून त्या व्यक्तीची योग्यता, त्याची जात याचा अंदाज बांधू नये. असे सांगून, कायकाच्या विभाजनावर निर्माण झालेले वर्गभेद, वर्णभेद काढून टाकून कायकाच्या माध्यमातून सामाजीक समानता बसवण्णांनी साधली.

इष्टलिंगाकारात असलेल्या देवाला भक्ताने आपल्या शरीरावर धारण करून आल्यावेळी त्याचे व्यवसाय कोणते म्हणून विचारल्यास वर्गभेद केल्याप्रमाणे होईल. जात विचारल्यांस वर्गभेद केल्याप्रमाणे होईल. महारांपासून विप्रांपर्यत, ब्राम्हणांपर्यंत कोणीही कोणतेही कायक करीत असेल तर ते श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच नव्हे.

प्रधानमंत्रांच्या कायकाएवढेच चांभाराचे कायकही समाजास आवश्यक आहे, ब्राम्हणापासून भंग्यापर्यंत कोणत्याही जातीचा का असेना, त्याने इष्टलिंग धारण केल्यावर त्याचे जातीस्मरण नाशपावून गुरू करजात होतो. गुरूभक्त होतो. कोणत्याही जातीचा आणि कायकाचा संबंधच नाही. म्हणून कायकतत्व प्रतिपादन करतो.

चतुर्विध सर्व मूल्यांचे उदात्तीकरण व्हावयास हवे. पैसे कमविण्याची विद्या शिकाल्यास ते पुरेसे नाही.तर त्या पैशाचा विनियोग करण्याची कला ही शिकावयास हवीय.मानवाजवळ तीन संपत्ती आहेत तन,मन,धन.ही त्रिविध संपत्ती व्यर्थ न घालविता गुरू-लिंग-जंगमाच्या सेवेसाठी त्याचा वापर करावा.हे शरीर गुरूसेवेसाठी झिजवावे. म्हणजे गुरूधर्म प्रसार करताना आपणही तन-मनाने सेवा करावी.धर्म प्रसाराचे कार्य हे केवळ संन्याश्याची वा मठाधिका-यांची मालमत्ता नव्हे ते प्रत्येक अनुयायांचे ही कर्तव्य आहे. आपल्या संसारातून, व्यवहारातूनही काही वेळ राखून, धर्मप्रसाराचे कार्य करण्यास हे शरीर झिजवावे.

गुरूची पूजा कशासाठी करावी? गुरू होण्यास, गुरूकृपा मिळवून ज्ञान संपादन करण्यासाठी, गुरूचे कार्य करण्यासाठी ह्या शरीराचा उपयोग व्हावा. मन लिंगाठायी रमावे.

मुक्ती-बंधन या दोन्हीस कारणीभूत असलेल्या मनाला केवळ कामिनी, कांचन, जमिनीत आसक्त राहू न देता परमात्माचा अनुग्रह मिळवण्यासाठीही आसक्त व्हावे. धन जंगमास द्यावे, अर्पण करावे म्हणजे धर्मप्रसारक महात्म्यांना धन देऊन धर्मदासोहात भागीदार व्हावे. दीन-दलितांच्या सेवेस, दु:खितांचे दु:ख निवारण करण्यासाठी धनाचा विनियोग करावा. याप्रमाणे आपल्या प्राप्तीतून, मिळकतीतून, एक भाग समाजासाठी वेचणारा, दासोऽहं भाव असणाराच लिंगायत होय.

आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात संग्रह करणे ही फार मोठी चूक आहे. काही थोड्यांनी असा संग्रह केल्याने असंख्यांना गरीबीत जगावे लागते. जरूरीपेक्षा अधिक काम व कष्ट करू नये तसे केल्यास दुसन्यांस काम न मिळून निरूद्योगाची समस्या उद्भवते. जरूरीपेक्षा जास्त संग्रह केल्यास असलेले व नसलेले' असे वर्ग निर्माण होतात. समाजातील काहींनी श्रम करावे आणि काहींनी बसून खावे हे चुकीचे व अन्यायकारक आहे. सर्वजणांनी कायक, कला व उपासना समानतेने करावी अशी शरणांची घोषणा आहे. यावर बसवेश आपल्या वचनातून म्हणतात :

“कसभर कनक, वस्त्रातील एकल धागा
आज वा उद्या येईल उपयोगा,
असे मनी नच येई याची वाहतो आण
शरणगणांचे धरूनी पाय ........कूडल संगम देवा'


आजचे जीवन आज भोगणे, उद्या राहू द्या म्हणून संग्रह करणे चुकीचे असे. आपल्या जरूरीपेक्षा अधिक मिळकत झालेले धन जमिनीत पुरून ठेवणे, व्याजबट्टा व्यवहार करणे ही सर्व कर्मे चुकीची आहेत. धनाचा समाज सुधारण्याकरिता, समाजाच्या उन्नतीकरिता विनियोग करावा. उन्नत असे सामाजिक कार्य पूर्ण करण्यास धन हे एक साधन असून, सिध्दी नव्हे. अवश्य तेवढीच किंमत देऊन वापर करावा, संग्रह करू नये.

एक वृक्ष आपल्या मुळांच्या द्वारे सत्व शोषण करतो, त्याचप्रमाणे परमात्मा हा चैतन्यमय व्यक्तींच्या मुखे स्वीकारतो. म्हणून देवाची पूजा करण्याची इच्छा असणा-यांनी समाजासाठीही श्रम घ्यावे.

१) लिंगावर विश्वास ठेवितो तो शहाणा
जंगमासाठी धन देणारा शहाणा.
२) जंगमात लिंग आहे म्हणून दृढ विश्वास
असेल त्यास दिसे संगमनाथ,
३) धन देऊन जंगमाची कृपा संपादन करावी.


गांवोगावी फिरून धर्मप्रचार करणाच्या धर्मप्रचारकाला धनाची फारच जरूरी असते.त्याचप्रमाणे समाजात असणा-या दुर्बल जीवांना धनाची आवश्यकता जास्तच असते.म्हणून त्यांना धनसहाय्य करावे. बसवण्णा म्हणतात:

“जेवणारा जंगम आल्यास चालता हो' म्हणती
न जेवणाच्या लिंगाला नैवेद्य दाविती'

‘जेवणारा जंगम म्हणजे केवळ जंगम जातीत जन्मलेला घरोघरी जेवणारा स्वामी नव्हे,भुकेला चैतन्यात्मक जीव असा अर्थ होतो.सणासुदीच्या वेळी आठदहा घरी निभावासाठी जाऊन न जेवता, घरोघरी फिरून वरचेवर जेवणाच्याला परत त्यालाच जेवू घालण्याचा मूढ सांप्रदाय आपल्यात आहे.भुकेल्या व्यक्तीने दारी येऊन भिक्षा मागितल्यास वाढणार नाहीत.भुकेल्या जीवाला जेवू घालणे धर्म आहे. केवळ नियम म्हणून स्वामी लोकांना त्रास देऊन जेवू घालणे हा धर्म नव्हे. म्हणून भुकेली व्यक्ती आल्यास जेवू न घालता,न जेवणाच्या लिंगाला नैवेद्य दाखवणे हास्यास्पद होय,असे बसवण्णा म्हणतात.

‘लिंगाची पूजा जंगमास दुर्लक्ष
अरेरे घायाळ होते माझे मन "

“भक्तीच्या सामानास, जंगमाचे कर”


करपात्र सामान गावात नेताना कर न देता आत जाण्याची परवानगी नसते.तद्वत भक्तीचे सामान देवाच्या ठिकाणी न्यावयाचे असल्यास समाजातील दीन, दलित, दुबळ्या जीवांची सेवा करून तो कर भरावाच लागतो.म्हणून व्यक्तीने समाजाची सेवा करावी, पण ती कोणत्या भावनेने?

“भक्त होऊन लिंग जंगमाची पूजा करावी'' (ब.व.१८५) म्हणजे समाजासाठी आपण श्रम घेत असताना, आपल्या कमाईतून खर्च करताना, मी ’दानीश्रेष्ठ' अशी भावना न ठेवता, दास-सेवक-भक्त म्हणून किंकर भावनेने, दासोऽहं भावनेने ही सेवा करावी.

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous लींगाचार शिवाचार Next