Previous लिंगायत सिध्दांत (लिंग) इष्टलिंग Next

गुरू , जंगम

*

अष्टावरणात सर्व प्रथम येणारे तत्व म्हणजे 'गुरूतत्व' होय. गुरूशिवाय गुरू कृपा नाही, इष्टलिंग नाही. बाकीचे कोणतेही आवरण नाहीत. गुरूपासून अनुग्रहीत झालेला लिंगायत हा शीर नसलेल्या धडाने पीठारोहण केल्याप्रमाणे होईल. निराकार परमात्म्यास माणसाचे मन सुलभपणे ग्रहण करणार नाही हे जाणून तो गुरू, लिंग, जंगमाच्या रूपात भक्ताजवळ येतो. भक्तत्व, गुरूत्व, जंगमत्व ही जन्मापासून आलेली जात नव्हेत. तर ती आपल्या स्वप्रयत्नाने मिळविलेली अर्हता (Qualifications) म्हणून लिंगायत धर्मशास्त्रांत सांगितले आहे की, हा जातीवाचक शब्द नसून अध्यात्माच्या आरोहण स्थितीतील तीन अवस्था आहेत. हा शब्द कोणा एका व्यक्तीला जोडावयाचा झाल्यास त्याच्यात काही अर्हता, पात्रता असावी लागते. (अंग) शरीराने सदाचरण, शुध्द आचरण ठेऊन इष्टलिंगपूजा करण्याची शक्ती ज्याच्यात आहे, तो ‘भक्त' होय. मनांत ध्यान स्थिर होऊन प्राणलिंगाचे ध्यान करण्याचे सामर्थ्य ज्याच्यात आहे तो गुरू आणि आत्मसंगाने अनुभव दृढ होऊन भावलिंगाचे अनुसंधान जो करतो जंगम होय. याप्रमाणे गुरू आणि जंगम हे अत्युन्नत स्थिती प्राप्त करून घेतलेले महंत होत. षटस्थलाप्रमाणे भक्त-महेश स्थलात असणारा तो भक्त, प्रसादी-प्राणलिंगी स्थलात असणारा तो गुरु आणि शरण-ऐक्य स्थलात असणारा तो जंगम, गुरु म्हणजे शिवपथावर उभा राहून दिग्दर्शन करीत या मार्गावर जा तुझे ध्येय तू गाठशील म्हणून मार्गदर्शन करणारा जंगम म्हणजे जो ध्येय गाठलेला आहे तो परत येऊन सहपथिक

घेऊन भक्त, भाविकाला सन्मार्गावर घेऊन जाणारा होय.

’जंगम' हा शब्द शरण धर्मात अत्युन्नत तत्वाचे नाव आहे. जनन मरण-गमन शून्य केलेला तो जंगम होय. जातिवाचक नसून, स्वरूप साक्षात्कार लाभलेला,अनुभावी, स्फुरणात्मक ज्ञानी, धर्मप्रचारक असा अर्थ होतो. श्री.अरविंद यांनी म्हटल्याप्रमाणे अतिमानवाचे व्यक्तित्व व्यक्त होते. जंगम हा शब्द जातीवाचक म्हणून काही लोकांची चुकीची समजूत झाल्यास तो अपराध ठरतो. चन्नबसवेश आपल्या वचनात म्हणतात

“कोणत्याही कुलात जन्म घेतला
तरी ज्यावर होते महादेवाची
कृपा-तोच खरा कुलज पहा (च.ब.व.६००)

गुरत्व,स्वामीत्व ही जातीवरून आलेले नाहीत. तर ते त्याग, वैराग्य, सदभक्ती आप तपस्या यावरून आलेले आहेत. कोणीही व्यक्ती लिंगदीक्षा घेतल्यावर आपल्या पूर्वाश्रम मधून निघून पुनर्जन्म घेतलेला सद्गुण आणि आत्मशक्ती वाढवलेला गुरू होऊ शकतो, जंगम बनु शकतो. स्वामी मठाधिकारीही होऊ शकतो. म्हणून चन्नबसवण्णा म्हणतात

"देह नाम न दिसे बरे लिंगायतास
मानव नाम न दिसे बरें जंगम भक्तास ------"

देहातील नास्तिकतेचा अंधार नाहीसा केलेला तोच लिंगायत जातीस्मरण,मनातील कामना नष्ट केलेला तोच जंगम, आपण ग्रहण केलेला पदार्थ (अन्न) हा शिवप्रसाद म्हणून जाणणारा तोच प्रसादी, असे ज्यांनी त्यांनी प्राप्त करून घेतलेली अवस्था हीच आपापली स्थिती होत.

व्यक्तीगत संबंधाने गुरू-जंगम या तत्वाबद्दल विचार केल्यास तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की गुरू म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीबद्दल अज्ञान नाहिसा करणारा, त्याच्यावर अनुग्रह, कृपा करून लिंगांग संबंध जोडणारा होय. गुरूशिवाय सर्व स्वामी, महात्मे हे जंगम होत. प्रत्येक व्यक्ती ज्या गुरूकडून दीक्षा घेतो त्याला आपला गुरू मानून बाकीच्या स्वामी, महात्म्याना जंगम म्हणून स्वीकार करावा. नाही तर प्रत्येक गुरूपासून एकेक पंथ निर्माण होऊन शेकडो उपपंथ (Lococults) होऊन समाजात बंधुत्व, एकता, राहणार नाही. काही लोक स्वगुरू पूजक आणि पर गुरू निंदक असतात. अशा लोकांना पाहून चन्नबसवेश वदले.

“गुरू लिंगाची पूजा करून, जंगम लिंगाला दुर्लक्ष केल्यास
गुरूपूजकांना शिवदूतांचे दंड तू दिलास
जगातील सामान्यांना,यमदूतांचे दंड तू दिलास
भक्ती न जाणता, युक्ती न जाणती कूडलचन्नसंगमेश” (च.ब.व.९२५)

शिक्षेत दोन प्रकार एक यमदूतांची शिक्षा दूसरी शिवदूतांची शिक्षा. परमात्म्यावर विश्वास न ठेवता नास्तिक राहून विषय लोलुप होऊन राहणा-यांना यमदूताकडून शिक्षा होते. धर्म स्वीकारून, दीक्षा संस्कार घेऊन पुजादि सत्कर्म करूनसुध्दा अन्य महात्म्यांची, संतांची, जंगमांची निंदा करणा-यांना शिवदूताकडून शिक्षा मिळते. सर्व महात्माठायी पूज्य भाव ठेवणारा व विशाल दृष्टी असणाराच खरा आध्यात्म जीव होय.

चालणारा चैतन्य, ‘नडे लिंग' म्हणजेच जंगम असाही एक अर्थ होतो. म्हणजे तत्व प्रचाराचे कार्य हाती घेऊन गांवोगांवी बोध करीत संचार करणारा हा जंगम होय. पण धर्मात शिथिलता पसरलेल्या आजच्या काळात कोणाला जंगम मानावे हे न जाणता लोक आडव्या पालखीत बसणा-या सोन्याचे किरीट घातलेल्या, थाटामाटात राहणा-यांनाच मानतात. पण ही सर्व जंगमांची लक्षणे नव्हेत. काही लोक ज्ञानप्रचार करणा-या सर्वसामान्य मानून, भिक्षुक समजतात. आपण होऊन जनतेकडे धर्मप्रचारासाठी जाणा-यांना लोक कमी लेखतात. असा दृष्टीकोन असणा-यावर शरणांनी कडकपणे टीका केली आहे.

ज्ञानी जंगम धर्मरक्षणाकरिता आपण होऊन श्री सामान्य लोकांकडे जाऊन निस्वार्थपणे ज्ञान देणान्यांना कमी लेखाणारि समजून, दृष्टीकोन बदलून, ज्ञानाचा प्रकाश वाढावयास हवे म्हणूनच बसवेश्वर सांगतात,

'भिकारी म्हणू नका माझ्या वडिलांना
नको म्हणू भिकारी माझ्या बांधवांना,
माझ्या मालकांना,..... कूडल संगमनाथा (ब.ष. हे. व.११५)

असा दृष्टीकोन समाजात वाढल्यास, निस्वार्थीपणे त्यागी जीवन जगणारे अनेक लोक सेवेसाठी उत्साहाने पुढे सरसावतील यात शंका नाही.

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायत सिध्दांत (लिंग) इष्टलिंग Next